मृत्युच्या थंड निश्‍चलतेचं गारुड ओफेलिया(Ophelia painting )

‘चित्र’ म्हणजे काय? फक्त काही आकार, रेषा.. आणि रंग? की त्याहीपलीकडे काही असतं लपलेलं कॅनव्हासच्या पोटात? चित्रं कशी पाहावीत?..आणि अनुभवावीत? चित्रांच्या वाटेने कसं शिरावं आयुष्याच्या निबिड अरण्यात?
- एक प्रवास.


जॉन एव्हरेट मिलेस या ब्रिटिश चित्रकाराने १८५१-५२ मध्ये काढलेलं पेंटिंग ‘ओफेलिया.’ पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला ना या चित्रकाराची काही माहिती होती, ना ‘ओफेलिया’ नावाच्या पार्श्‍वभूमीची. इंग्रजी क्लासिक साहित्याशी फारसा संबंध नव्हता. 
मात्र, ओफेलियाचं पेंटिंग पाहताना मनाला एक विलक्षण अस्वस्थता आली होती. रंगांचं एक अद्भुत, देखणं रसायन चित्रात होतं, त्याशिवाय अजूनही काही होतं. पाण्याकाठच्या गर्द झाडोर्‍याचा एक हिरवा घुमटाकार आणि त्यात साचलेला निस्तब्ध, निश्‍चल कोंडलेपणा. दाट, हिरव्या झाडा-फुलांचं त्यातलं अस्तित्व एरवीसारखं मनाला सुखद, प्रसन्न अनुभव देत नव्हतं. कारण खालच्या शेवाळलेल्या हिरव्या पाण्यात ‘ती’ होती. अर्धवट बुडालेली, तरंगती ओफेलिया. दोन्ही बाजूला पसरलेले तिचे हात, अर्धमिटली वर पाहणारी दृष्टी, उघडे ओठ आणि चेहर्‍यावरचे गोठून राहिलेले तणावग्रस्त भाव, पायातळी पाण्याने भरून वर उचलल्या गेलेल्या पोशाखाची स्थिरावलेली वर्तुळं. आणि सर्वांत थरारून टाकत होती तिच्या स्तब्ध शरीराला लगटून तरंगणारी फुलं, काठावरून तिच्या दिशेने खाली झेपावणारी फुलं. ओफेलिया आता जिवंत नाही हे कोणी सांगण्याची गरजच नव्हती. 
मृत्यूच्या थंड निश्‍चलतेचं जे अस्तित्व ओफेलियाच्या पेंटिंगमधल्या देखण्या, बंदिस्त अवकाशात काजळी धरून होतं, ते आता शांत नव्हतं. काहीतरी अस्वस्थ, खळबळलेपण त्या शेवाळलेल्या पाण्यातून, तरंगत्या फुलांतून, दाट हिरव्या झाडांतून उसळी मारून वर येत होतं. अजून तरंगत असणारी, आता काही क्षणांतच पाण्यात बुडून नाहीशी होऊ पाहणारी ओफेलिया तिची गोष्ट सांगू पाहत होती.
शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या सुप्रसिद्ध नाटकातली ही ‘ओफेलिया.’ वडील, भाऊ, प्रियकर या तिच्या आयुष्यातल्या तिन्ही पुरुषांकडून धिक्कारली गेलेली, प्रतारणा, नाकारलेपण, फसवणूक पदरात पडलेली, वडिलांच्या हातून झालेला हॅम्लेटचा, स्वत:च्या प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सैरभैर झालेली, रोमॅन्टिक वेदनेचं प्रतीक ओफेलिया. आपल्या भ्रमिष्टपणात नदीच्या काठावर फुलं गोळा करत, गाणं गुणगुणत असताना झाडाची फांदी तुटते आणि ती पाण्यात पडते. पाण्यात पडल्यावरही ती जीव वाचवायचा कोणताही प्रयत्न करत नाही, कदाचित तिची तशी इच्छाही नसावी, किंवा धोक्याची पुरेशी जाणीवच तिच्या सैरभैर मनाला नसावी. ती गाणं गात राहते. तिच्या घोळदार झग्यात हवा भरते त्यामुळे सुरुवातीला थोडा वेळ ती पृष्ठभागावर तरंगते; पण मग पाण्याने कपडे भिजतात, जड होतात आणि तिला पाण्याच्या आत खेचून नेतात. शेवाळलेल्या पाण्यात ती शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन होते. 
ओफेलियाचा मृत्यू साहित्य जगतातला सर्वांत काव्यात्म, सुंदर मृत्यू समजला जातो. ‘हॅम्लेट’ नाटकाच्या प्रयोगात तो प्रत्यक्ष घडताना दाखवलेला नाही. त्यामुळेच त्या काळातल्या व्हिक्टोरियन पेंटर्सपासून आजतागायत अनेकांनी ओफेलियाचा मृत्यू कॅनव्हासवर चितारला. 
जेमतेम २२/२३ वर्षांचं वय असलेल्या तरुण मिलेसलाही कोवळ्या, उमलत्या वयातल्या ओफेलियाचं जीवनाकडून नाकारलं जाणं आणि त्यातून तिने शांतपणे, गाणं गात, निसर्गरम्य नदीच्या पात्रात स्वत:ला मृत्यूच्या स्वाधीन करणं चटका लावून गेलं. ओफेलियाला कॅनव्हासवर उतरवण्याचा त्याने ध्यास घेतला. मिलेस हा प्रतिभावान, तांत्रिकदृष्ट्या हुशार चित्रकार. ‘प्रीराफेलाईट ब्रदरहूड’ या ग्रुपची स्थापना केलेल्या तिघा सदस्यांपैकी तो एक (उरलेले दोघे- डांटे गॅब्रिएल रोझेटी आणि विल्यम हॉलमन हंट.) 
१८५१ च्या उन्हाळ्यात मिलेसने या पेंटिंगवर काम करायला सुरुवात केली. यातलं लॅन्डस्केप त्यानं आधी रंगवायला घेतलं. योग्य लोकेशन मिळवण्याकरता तो भरपूर हिंडला. सरे परगण्यात किंगस्टन अपॉन थेम्स जवळच्या एवेल नदीकाठी त्याला हवी तशी दाट वनस्पतींनी वेढलेली जागा सापडली. डोक्यावर जेमतेम सावली देणारी छत्री उभारून मिलेसनं तासन्तास एका जागी उभं राहून नदीकाठची झाडं, फुलं बारकाईनं, कौशल्यानं रंगवली. कित्येकदा सलग अकरा तास तो उभा असे. उन्हाळ्याचे दिवस. डोक्यावर रणरणतं ऊन आणि नदीकाठचा सोसाट्याचा वारा. मिलेस त्याच्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात लिहितो की, ‘इतका भणाणता वारा. मी कॅनव्हाससकट उडून पाण्यात जाऊन पडेन आणि मला ओफेलियाच्या वेदनांशी समरस होण्याचा अनुभव घेता येईल.’ अर्थातच तसं झालं नाही. मिलेस पाच महिने पेंटिंग करत राहिला. 
त्यानंतरच्या हिवाळ्यात लंडनमध्ये मिलेसनं प्रत्यक्ष ‘ओफेलिया’ रंगवली. एलिझाबेथ सिडाल नावाची १९ वर्षांची मॉडेल त्याला मिळाली. ओफेलियाला शोभून दिसेल असा अँॅन्टीक गाऊन त्याने चार पौंडांना आणला आणि मग आपल्या लहानशा जागेतला बाथटब पाण्यानं भरून त्यानं एलिझाबेथला त्यात झोपवलं. लंडनचा कडाक्याचा हिवाळा. एलिझाबेथला पाण्याचा थंडपणा झेपेना. तेव्हा त्या बाथखाली त्याने मेणबत्त्या, काही तेलाचे दिवे लावले. आणि मग मिलेस त्याच्या सवयीप्रमाणे चित्र रंगवण्यात गढून गेला. ते मिणमिणते दिवे केव्हाच विझून गेले. हे मग रोजचंच झालं. एलिझाबेथ तशीच गारठलेल्या अवस्थेत तासन्तास झोपून राहायची. मिलेसला चित्र पूर्ण करायला चार महिने लागले. चित्र पूर्ण झालं खरं; पण एलिझाबेथ न्यूमोनियाने आजारी पडली. त्यात तिचा मृत्यू झाल्याची अफवा नंतरच्या काळात पसरली; पण त्यात तथ्य नव्हतं. एलिझाबेथने मिलेसचा सहकारी रोझेटीसोबत लग्न केले. एलिझाबेथच्या वडिलांनी तिच्या उपचारार्थ पन्नास पौंडांची रक्कम मात्र मिलेसकडून वसूल केली.
मिलेसचं सर्वांत प्रसिद्ध आणि कौतुकास पात्र ठरलेलं हे चित्र. ओफेलियाचा निष्पापणा, भ्रमिष्टता, बुडून मरण्यातली भीषणता, आणि आजूबाजूच्या निसर्गातला देखणेपणा हे त्याने इतक्या अचूकतेनं दाखवलं की, आजही ते त्याबाबतीत एकमेवद्वितीय ठरतं. 
१८५२ मध्ये रॉयल अँकॅडमीच्या प्रदर्शनात पहिल्यांदा हे चित्र प्रदर्शित झालं तेव्हा प्रेक्षकांनी सुरुवातीला काही प्रतिक्रिया व्यक्त करायचंच नाकारलं. साहजिकच आहे. मृत्यूचा हा देखणा, भीषण आणि निश्‍चल आविष्कार त्यांनी इतक्या जिवंतपणाने आधी कधीच पाहिलेला नव्हता. तो स्वीकारणं त्यांच्या दृष्टीनं फार कठीण होतं. मात्र, आर्ट र्जनल्समधून समीक्षकांनी मिलेसनं घेतलेल्या कष्टांची आवर्जून दखल घेतली.
चित्रं तुमच्याशी बोलतात आणि तुम्हाला उलट स्वत:शी बोलायला लावतात. 
‘ओफेलिया’ हे त्यापैकी महत्त्वाचं चित्र.
चित्रभाषा ऐकायची, समजून घ्यायची म्हणजे नेमकं करायचं तरी काय याचा नेमका धडा मिलेसच्या ‘ओफेलिया’तून मिळतो.
चित्र जे सांगू पाहतंय ते नीट ऐकायचं. 
कळलं नाही तर प्रश्न विचारायचे. स्वत:ला आणि चित्रालाही.
मित्र बोलत नसला तर काय करतो आपण?
कविता समजली नाही तर काय करतो?
तेच करायचं.
पुन:पुन्हा वाचायची. मुक्कामापर्यंत पोहोचवणार्‍या सगळ्या वाटा, शक्यता धुंडाळायच्या. 
चित्रकाराकडे त्याला जे सांगायचं आहे त्याकरता रंग-रेषा-आकार असतात. चित्र ही त्याची संहिता. त्याला काही संदर्भ असतात. त्यातला बंध जाणून घ्यायचा. 
ओफेलियाचं चित्र पहिल्यांदा पाहिलं तेव्हाची माझी पहिली प्रतिक्रिया मला आजही जशीच्या तशी आठवते. तेव्हा मला चित्रकाराबद्दल, ‘ओफेलिया’ नावाबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. आज जेव्हा बुडणार्‍या ओफेलियाला पुन्हा पाहिलं तेव्हा तिची गोष्ट मला माहीत होती. चित्रकाराबद्दलही माहीत होतं. तरीही माझी प्रतिक्रिया पहिल्यांदा चित्र पाहताना होती तशीच झाली. चित्राच्या देखणेपणापेक्षाही त्यातल्या अस्वस्थतेनं भारून टाकणारी. 


‘‘It is not the language of painters but the language of nature which one should listen to.... The feeling for the things themselves, for reality, is more important than the feeling for pictures.’’
- Vincent Van Gogh


- शर्मिला फडके, लोकमत साठी
मुक्त पत्रकार, लेखक आणि अनुवादक. ‘चिन्ह’ या कलावार्षिकाच्या कार्यकारी संपादक.

manthan@lokmat.com

[Ophelia is a painting by British artist Sir John Everett Millais, completed between 1851 and 1852. Currently held in the Tate Britain in London, it depicts Ophelia, a character from Shakespeare's play Hamlet, singing before she drowns in a river in Denmark.
The work was not widely regarded when first exhibited at the Royal Academy, but has since come to be admired for its beauty and its accurate depiction of a natural landscape. Ophelia has been estimated to have a market value of around £30 million.]

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...