‘फ्रंटलाइन’ नियतकालिकाच्या अगदी अलिकडच्या अंकात गुलाम मुर्शीद यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या ,बांगलादेशमधील लौकिकाच्या चढउताराबाबत लिहिले आहे. बांगलादेश जोपर्यंत पूर्व पाकिस्तान होता (१९७१ पर्यंत), तोपर्यंत रवींद्रनाथांकडे फारसे आदराने पाहिले जात नव्हते; त्याचे एक कारण म्हणजे ते उच्चवर्णीय समाजातील, सधन कुटुंबातील होते; आणि दुसरे मोठे कारण म्हणजे ते हिंदू होते! १९६१ मध्ये रवींद्रनाथ टागोर जन्मशताब्दीच्या वेळी पाकिस्तान सरकारतर्फे आर्थिक मदत प्राप्त होणाऱ्या, पाक सरकारचे पाठबळ लाभलेल्या वृत्तपत्रांनी शताब्दी वर्षांतच रवींद्रनाथांची बदनामी करणारे ,त्यांच्यावर टीका करणारे अनेक लेख प्रसिद्ध केले. तथापि, जनतेचा कल, ओढा यावर त्याचा परिणाम अजिबात झाला नाही. पुढे आणखी नऊ वर्षांनी स्वतंत्र बांगलादेश निर्मितीची चळवळ जसजशी जोर धरू लागली, तसतशी टागोर यांच्या आपल्या जन्मभूमीचे गुणगान करणारी गाणी, कविता, लोकांच्या तोंडी सतत येऊ लागल्या. पश्चिम पाकिस्तानच्या प्रभाव-दबावाची लोकांना पर्वा नव्हती. टागोर यांची नाटके, नृत्यनाटिका लोक मोठय़ा प्रमाणावर सादर करू लागले. धर्मनिरपेक्ष बंगाली संस्कृतीचे ते प्रतीक होते; असे गुलाम मुर्शीद यांनी म्हटले आहे.
प्रांताभिमान आणि जातीयवाद या गोष्टी रवींद्रनाथांच्या रक्तात अजिबात नव्हत्या. किंबहुना तो विचारही त्यांना कधी शिवला नाही.त्यांचे समकालीन परंतु वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलेले कवी नझरुल इस्लाम यांचेही अगदी असेच होते. तरीही नझरुल यांना अनेक वर्षे मुस्लिम समाजाचे कवी म्हटले जाई. वास्तविक त्यांनाही जातीयवाद, धर्मवाद या गोष्टी कधी शिवल्याही नाहीत. आयुष्याची अखेरची वर्षे त्यांनी ढाक्यात व्यतीत केली आणि इस्लामी प्रजासत्ताकाचे राष्ट्रीय कवी म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले; तरीही रवींद्रनाथांप्रमाणेच नझरुल यांच्या लेखनात, काव्यात धर्मनिरपेक्ष बंगाली संस्कृतीच प्रतीत होते.
डिसेंबर २०११ च्या अखेरच्या आठवडय़ात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याच्या साल्टलेक परिसरातील एक प्रचंड वास्तू, कवी नझरुल इस्लाम यांचे नाव देऊन तेथे वस्तुसंग्रहालय आणि संशोधन केंद्र उभारले जाईल, अशी घोषणा केली. ही वास्तू एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असे. आता तेथे कवी नझरुल इस्लाम यांच्या साहित्यिक कामगिरीचे संशोधन केंद्र उभे राहणार आहे. या वास्तूमध्ये सर्वात जास्त काळ वास्तव्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जवळपास ३० वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले ज्योती बसू यांचेच होते. तथापि, १९७२ मध्ये अ. भा. काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीसुद्धा या प्रशस्त वास्तूमध्ये काही काळ राहिल्या होत्या. पुढे या वास्तूला इंदिराजींचे नाव देण्यात आले. या ‘इंदिरा भवन’चे नामांतर करण्याचे आता ममता बॅनर्जी यांनी ठरविले असून, त्या वास्तूला आता नझरुल इस्लाम यांचे नाव देण्याचे घाटत आहे.
ममताजींच्या या निर्णयाने काँग्रेसजनांच्या कपाळावर आठय़ा उमटणे स्वाभाविकच आहे. या वास्तूचे ‘इंदिरा भवन’ हेच नाव कायम ठेवावे; नाव बदलू नये. आमच्या दिवंगत नेत्या इंदिराजी यांच्या नावाचा या वास्तूशी अधिक जवळचा संबंध आहे. इंदिराजींच्या स्मृतींशी लाखो लोकांच्या भावना निगडित आहेत; तेव्हा वास्तूचे नामांतर करू नये असे पत्र पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप भट्टाचार्य यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिले असून, वास्तूचे नामांतर केल्यास काँग्रेसतर्फे राज्यभर निषेध आंदोलने केली जातील; असा इशाराही त्यांनी दिला आहे.
साल्टलेक परिसरातील त्या वास्तूचे नामांतर करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामागची संभाव्य कारणे शोधायची झाल्यास चार गोष्टी सांगता येतील. पहिली गोष्ट म्हणजे नझरुल इस्लाम यांची गाणी, कविता आणि इतर साहित्याबाबत सर्वानाच अनेक वर्षांपासून कमालीचा आदर आणि आकर्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नझरुल इस्लाम हे जरी धर्म-जात-पंथवादी नव्हते; तरी ते जन्माने मुस्लिम असल्याने त्यांचे नाव या वास्तूला दिल्याने राज्यातील मुस्लिम समाजाला समाधान लाभेल; आणि अप्रत्यक्षपणे त्याचा राजकीय लाभ ममता बॅनर्जी यांच्या पदरात पडेल. तिसरी गोष्ट म्हणजे राज्यात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी असलेले सरकार असले; तरी दोन्ही पक्षांमधील दरी रुंदावत चालली आहे. मतभेद वाढत आहेत. थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध, लोकपाल विधेयकात लोकायुक्ताची तरतूद अशा काही मुद्दय़ांवरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मतभेद वाढले आहेत. चौथी गोष्ट म्हणजे इंदिरा गांधी यांचे नाव, प्रतिमा नष्ट करण्याचेच ममता बॅनर्जी यांच्या मनात असावे. कारण पश्चिम बंगालच्या राजकीय संस्कृतीत आजपर्यंत एकाच महिलेचे- इंदिराजींचे नाव अग्रस्थानी राहिले आहे. बांगलादेशच्या निर्मितीनंतर (१९७१) त्या विजयाचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधी यांना गेले. त्यांची दुर्गादेवीशी तुलना केली गेली. त्यावेळीही इंदिराजी साल्ट लेक भागातील त्याच वास्तूमध्ये वास्तव्यास होत्या. अर्थात, आता ४० वर्षांनंतर तो प्रभाव कमी झाला आहे. तो आणखी कमी करण्यासाठी या नामांतराचा बऱ्यापैकी उपयोग होईल; अशी ममता बॅनर्जी यांची धारणा असावी. मी ममता बॅनर्जीना कधीही भेटलेलो नाही. तसेच त्यांचे सल्लागार कोण आहेत, तेही मला माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामागचे नेमके कारण मी सांगू शकणार नाही. एका राजकीय नेत्याचे नाव असलेल्या वास्तूचे नामांतर करून एका कवीचे नाव त्या वास्तूला देण्याचा निर्णय नेमका कशासाठी घेतला गेला ते सांगणे कठीण आहे. तथापि, माझ्या तर्काप्रमाणे, वरील चार कारणांपैकी दुसरे आणि तिसरे कारणच या निर्णयामागे असावे. पहिले आणि चौथे कारण त्यामागे असण्याची शक्यता अगदी कमी.. म्हणजे जवळजवळ नाहीच!
म्हणजेच या निर्णयामागे मतपेढीचे राजकारण (व्होट बँक पॉलिटिक्स) असण्याचीच शक्यता अधिक आहे. साहित्याबाबतच्या, साहित्यिकांबाबतच्या प्रेमापेक्षा राजकीय स्वातंत्र्याबाबतचेच प्रेम जाणवते. निर्णयामागील कारण काहीही असो, त्या निर्णयाने मला आनंद झाला. माझी पहिली प्रतिक्रिया ही आनंद- समाधानाचीच होती. या निर्णयाचे वृत्त वाचल्यानंतर पूर्वी टीव्हीवरील एका कार्यक्रमात काँग्रेस महिला प्रवक्त्याबरोबर माझी झालेली चर्चा मला आठवली. हैदराबाद (आंध्र प्रदेश) मधील नव्या विमानतळाला राजीव गांधी यांचे नाव दिले गेले. तेव्हा केंद्रात आणि आंध्र प्रदेशातही काँग्रेसची सत्ता होती. आपल्या दिवंगत पतीचे नाव विमानतळ, पूल किंवा वास्तूला दिले जाणे हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आवडणारेच होते. टीव्हीवरील चर्चेदरम्यान, मी काँग्रेस महिला प्रवक्त्याला सुचविले की, या विमानतळाला राजीव गांधी यांच्याऐवजी कवी त्यागराजा यांचे नाव देणे अधिक उचित ठरेल. त्यागराजा हे आंध्र प्रदेशचेच सुपुत्र आणि त्यांचे साहित्य क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे म्हणून त्यांचे नाव देणे योग्य असे माझे म्हणणे होते.
मी बंगाली नाही आणि नझरुल इस्लाम यांचे लेखन इंग्रजीत अनुवादित केले असेल, तरच मला ते वाचता येईल. ममता बॅनर्जीबद्दल माझ्या भावना संमिश्र आहेत. सर्जनशील कलावंत आणि साहित्यिक यांच्या कार्याबद्दल फार पूर्वीपासून मला आदर असल्याने ममताजींच्या निर्णयाने एकीकडे मी मनोमन सुखावलो आहे; तर त्या निर्णयामागचे कारण पाहता किंचित द्विधा मनस्थितीत आहे. १९९० च्या दशकात गोपाळकृष्ण गांधी आणि एच. वाय. शारदाप्रसाद यांच्या नेतृत्वाखालील एका मोहिमेत मी सहभागी झालो होतो. प्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना ‘भारतरत्न’ हा बहुमान मिळावा यासाठीची ती मोहीम होती. राजकारणातील अनेक व्यक्ती आणि विशेष उल्लेखनीय कार्य न केलेल्या व्यक्तींना ‘भारतरत्न’ देण्यात आले; परंतु सुब्बुलक्ष्मी यांचा मात्र त्या सन्मानासाठी विचार होत नव्हता. आमची मोहीम यशस्वी झाली. एस. वाय. सुब्बुलक्ष्मी, लता मंगेशकर, पं. रविशंकर आणि बिस्मिल्ला खाँ या सर्वाचा एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने ‘भारतरत्न’ देऊन गौरव करण्यात आला. भारतीय प्रजासत्ताकाच्या या सर्वोच्च सन्मानाची प्रतिष्ठा, लौकिक त्यामुळे वाढला. कोलकाता शहरातील एका ऐतिहासिक वास्तूला आता एका कवीचे नाव दिले जात असल्याने मला समाधान वाटले. इंदिरा गांधी यांचे नाव काढून त्या वास्तूला नझरुल यांचे नाव दिले जात आहे; या वस्तुस्थितीची जाणीव असतानासुद्धा, केवळ एका साहित्यिकाच्या कार्याचा गौरव होत असल्याने मला आनंद वाटला. जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्वीपासून आदर आहे. तथापि, इंदिरा गांधी यांच्या काळातील आणि इंदिराजींनंतरच्या काळातील काँग्रेसच्या घराणेशाहीच्या संस्कृतीबद्दल माझ्या मनात काहीशी तिटकाऱ्याची भावना, अनादर आहे हे प्रामाणिकपणे सांगण्यास हरकत नाही. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा झाल्यानंतर काँग्रेसमधील या ‘संस्कृती’ने अगदी खालची पातळी गाठली आहे. हयात असलेली नेहरू-गांधी घराण्यातील माणसे- म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे सतत स्तुतिपठण करण्यात आमदार, खासदार, मंत्री धन्यता मानतात. तसेच नेहरू-गांधी घराण्यातील दिवंगत व्यक्ती म्हणजे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचेही गुणगान सतत गात राहणाऱ्यांची संख्या काँग्रेसमध्ये मोठी आहे. राजकारणात वर येऊ इच्छिणाऱ्या, मोठे पद मिळविण्याची लालसा असलेल्या काँग्रेसजनांना देशातील मोठय़ा वास्तू, ऐतिहासिक इमारतींना इंदिरा किंवा राजीव यांचे नाव देण्याचा आग्रह धरणे सूज्ञपणाचे वाटते, समंजसपणाचे वाटते. दिवंगत नेत्यांनी प्रत्यक्ष केलेल्या तसेच न केलेल्याही कार्याची वारेमाप प्रशंसा करणाऱ्या मोठमोठय़ा जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे यात आजचे काँग्रेसजन धन्यता मानतात. हे केल्याने आपण कृतकृत्य झालो, अशी त्यांची दृढभावना आहे. आता कोलकाता शहरातील इंदिरा भवनचे नामांतर करून ‘नझरुल भवन’ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर काँग्रेसजन जी आंदोलनाची भाषा करीत आहेत, ते त्यांच्या खुशमस्करेपणाचेच द्योतक आहे. आपण इंदिरानिष्ठ आहोत, हे सोनिया गांधींना दाखवून आपले उखळ पांढरे करून घेण्याचाच या काँग्रेसजनांचा यामागचा उद्देश आहे.
वास्तूंचे नामकरण आणि नामांतराच्या या खेळात सर्वसाधारणपणे राजकीय नेत्यांना गरजेपेक्षा खूप जास्त मिळते आणि लेखक, साहित्यिक, संगीतकार, कलाकार यांना फारच कमी मिळते, असे वाटणाऱ्यांनी कोलकातामधील या बदलाचा विचार करावा.
दक्षिण आशियातील एका मोठय़ा शहराकडे मी त्यांचे लक्ष वेधू इच्छितो. एका संपूर्ण विमानतळाला एका कवीचे नाव तेथे देण्यात आले आहे. होय, मी लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दलच बोलतो आहे. भारतीय माणसे ही पाकिस्तानी माणसांची बरोबरी करण्यास किंवा त्यांच्या वरचढ होण्यास कधी तयार नसतात; परंतु येथे मात्र अपवाद करायला हवा. उद्या समजा, पुण्यामध्ये नवे विमानतळ उभारायचे झाल्यास त्याला संतकवी तुकाराम यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणाचे नाव देणे उचित ठरेल का? तसेच, कोलकातामध्येही आणखी एक विमानतळ उभारण्याची गरज भासली, तर त्या विमानतळाला कोणा एकाच कवीचे नव्हे; तर रवींद्रनाथ टागोर आणि नझरुल इस्लाम या दोन्ही थोर कवींचे संयुक्त नाव द्यावे, असे सुचवावेसे वाटते..!
मूळ लेख:रामचंद्र गुहा - लोकसत्ता
ramchandraguha@yahoo.in
अनुवाद : अनिल पं. कुळकर्णी
No comments:
Post a Comment