संगोपन ‘तिकडलं’ आणि ‘इकडलं’


फार वर्षांनी गेझा लिंडेनबेर्ग या माझ्या तरुण मैत्रिणीकडे पाळणा हलला. ‘‘भारतात बाळांना काय कपडे घालतात? तसं मला काहीतरी आण,’’ अंस गेझानं आवर्जून सांगितलं होतं! र्जमनीतील हवामानाला मुंबईहून नेलेला बाळंतविडा नुसती शो-केसची धन होणार हे तिलाही कळत होतं ! पण कुतुहल मात्र जबरदस्त होतं ! झबलं, टोपडं, कुंची, काळ्या दोर्‍याचा करगोटा, पंचधातूचा वाळा.. या सगळ्याबद्दलचे गेझाचे प्रश्न काही संपत नव्हते. इतक्यात बाळराजांच्या खोलीतून ठणठणीत स्वरात रडण्याचा आवाज आला. गेझाने दुधाची बाटली भरून तयार ठेवलेली होती. बेबी कॉटच्या गजांमधून हात घालून तिने ती फ्लोरियानच्या तोंडात कोंबली.
‘‘अगं त्याला कुशीत नाही का घ्यायचं?’’ या माझ्या प्रश्नावर गेझाचे अगदी झिडकारल्यासारखं उत्तर -
‘‘छे ! सारखी अंगाची सवय मुलांसाठी अजिबात चांगली नसते.’’
अर्धी बाटली संपल्यावर बाळाचे चाळे सुरू झाले. उगीच आम्हाला हसून दाखव ! नाहीतर तोंडातनं आवाज काढ, निपल्सच चावत बस ! गेझाने मला बाळाच्या खोलीबाहेर जाण्याची विनंती केली. ते काय ते १0-१२ औंस त्याने आत्ताच प्यायचे होते म्हणे. नवीन चेहरा बघून तो एक्साईट झाला होता-असं तिचं म्हणणं. 
मी खोलीतून निघता निघता ती बाळाशी कसं एखाद्या मोठय़ा माणसाशी बोलावं तसं बोलत होती-ते ऐकू आलं. ‘शोन्याले माज्या’ इत्यादीवर एकदम फुली ! त्याची नॅपी वगैरे बदलून गेझाने त्याला हॉलमध्ये आणलं ! भोवती सगळी खेळणी, झुंबरं लटकवून आमच्या छान गप्पा सुरू झाल्या. घड्याळात दीड वाजला म्हणताना मला म्हणाली, ‘‘तू आडवार जराशी! विमानप्रवासानं थकली असशील. फ्लोरियानला आता फ्रेश एअरमध्ये न्यायची वेळ झाली.’’
प्रॅम तयार करून त्यात फ्लोरियानचं बोचकं टाकून, त्याला सतरा पट्टे बांधून र्जमन स्पीडने चालत बाई दिसेनाशा झाल्या.
मी संपूर्ण मुक्कामभर पाहत होते, गेझाने ठरवलेल्या टाइमटेबलप्रमाणे बाळाने खायचं, प्यायचं, झोपायचं असा कडक नियम होता. ही स्वयंपाक करताना बाळ आपलं त्याच्या खोलीत एकटं! कंटाळून रडणारं बाळ आणि भुकेनं, ओलं झालं म्हणून किंवा दुखून-खुपून रडणारं बाळ या रडण्यातला फरक ओळखण्याचं म्हणे तिने ट्रेनिंग घेतलेलं होतं! त्यामुळे फ्लोरियानने कितीही बोंबाबोंब केली तरीही निगरगट्टपणे आपला स्वयंपाक उतरवीत होती. मलाही जाऊन त्याला कुशीत घ्यायला बंदी होती. ‘‘वैशाली, त्याच्या सर्व गरजा मी पूर्ण केल्या आहेत. आता त्याने त्याचा त्याचा जीव रमवायचा आहे. मला कंटाळा आलाय म्हणून जगाने माझी करमणूक करायला धावत यावं, असं शिक्षण मी फ्लोरियानला देणं बरोबर आहे का? तूच सांग! आत्ता शिकला नाही, तर तो पुढे कधीच शिकणार नाही’’ 
‘आत्ता’ म्हणजे जेमतेम चार-पाच महिन्यांचं वयोमान गं! असं माझ्या मनात आलं. रात्रीही तीच गोष्ट. रात्रीचे आठ-नऊ तास फीड नाही म्हणजे कटाक्षाने नाही. मग बाळ कितीही रडो ! शिवाय फ्लोरियान पहिल्यापासून त्याच्या स्वंतत्र खोलीत झोपतो. त्याच्या बेबीकॉटपाशी एक यंत्र ठेवलेलं होतं. त्याचं कनेक्शन गेझा आणि अलेक्झांडर म्हणजे आईबाबांच्या-उशाशी होतं. काय टाइपचं रडं आहे ते ओळखून आई किंवा बाबा रात्री त्याच्या खोलीत जातात. एरवी नाही.
गेझा आणि अलेक्झांडर हे कुठलंही अपवादात्मक उदाहरण नसून मध्य आणि उत्तर युरोपात संगोपनाचं हे अगदी सार्वत्रिक दृश्य आहे. त्यामागे एक वेगळा विचार आहे. सर्व देशच्या देश एका शिस्तीने वागतो, बरोबर काय आणि चूक काय या सीमारेषा त्यांच्यापुरत्या अगदी सरळसोट आखलेल्या असतात - या सर्वांची सुरुवात अशी एकरेषीय संगोपन विचारात असते, हे विसरून चालणार नाही.
महायुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आणि विशेषत: अडुसष्टच्या क्रांतीनंतर मध्य आणि उत्तर युरोपात कुटुंब आणि संगोपन या दोन गोष्टींकडे ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ या कल्पनेला मध्यवर्ती कल्पून पाहिलं गेलं ! तसंच लहान मुलांनी लैंगिक विकृतीची शिकार बनू नये म्हणून कडक कायदे केले गेले. शिक्षकांनी, पालकांनी मुलांशी वागताना आदराची आणि पावित्र्याची सीमारेषा ओलांडू नये यावर कायद्याची उग्र नजर राहिली.
र्जमनीतील बालवाडीतील एका मुलीने एकदा पुरुषाच्या लिंगासारखं चित्र काढलं. या एका कारणास्त तीन वर्षाच्या त्या मुलीला तत्क्षणी अज्ञात ठिकाणच्या अज्ञात फॉस्टर फॅमिली (सांभाळ करणारे कुटुंब)कडे पुढच्या संगोपनासाठी सोपविण्यात आलं. बालवाडी सुटण्याच्या वेळी तिला न्यायला आलेल्या आईला फक्त ही बातमी सांगण्यात आली. त्या आईने सर्व न्यायालयांचे दरवाजे ठोठावले, तिच्या बाबांनी स्वत:ची हर तर्‍हेची मानसिक चाचणी करून घेऊन तेही पुरावे सादर केले. परंतु त्याला यश आलं नाही. गुप्त पोलिसांच्या तत्परतेने या अँक्शन्स घेतल्या जातात. मूल १८ वर्षांचं होईपर्यंत त्याचं नखही आई-बापांना दिसू शकत नाही. 
या सगळ्या आठवणी येण्याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून नॉर्वेमध्ये अनुरूप आणि सागरिका भट्टाचार्य या भारतीय दाम्पत्याने भोगलेल्या मानसिक यमयातना! त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा अविज्ञान आणि अंगावर दूधपिती तीन महिन्यांची इवलीशी ऐश्‍वर्या यांना नॉर्वेच्या बालसुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी रातोरात अज्ञात जागी हलविलं आणि अज्ञात डॉक्टर फॅमिलीच्या हातात सोपविलं. याचं कारण? अनुरूप आणि सागरिका म्हणे संगोपनात कमी पडत होते. तरी आई-बाप भरवतात. शिवाय तो आई-बाबांपाशी त्यांच्या कुशीत झोपतो आणि इवलीशी अंगावर पिती ऐश्‍वर्या? असं मूल आईपासून तोडणं हे नॉर्वेजियन कायद्याप्रमाणे क्रौर्य नव्हे काय? तर यावर नॉर्वेच्या अधिकार्‍यांचं उत्तर - तिची आई सागरिका डिप्रेशनमध्ये असल्यासारखी वाटते. त्यामुळे ती ऐश्‍वर्याला वाढवण्यात कमी पडू शकते आणि दुधाचं काय एवढं? ते पंपाने काढून आमच्याकडे आणून पोचवावं! आम्ही ते त्या संगोपन करणार्‍या कुटुंबाला पोचवू!
संस्कृतिसंघर्षाचं हे नुकतंच घडलेलं उदाहरण ! नॉर्वेच्या अधिकार्‍यांनी इतकी साधी गोष्ट लक्षात घेतली नाही, की संगोपन हे प्रत्येक संकृतीत अगदी वेगळ्या प्रकारे होत असतं ! हाताने भरवणं ही गोष्ट भारतीय संस्कारांमध्ये अतिशय वेगळ्या तर्‍हेने पाहिली जाते. आई-मुलाचं ‘बाँडिंग’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नॉर्वेच्या विमानात बसलं की भारतीय माणूस नॉर्वेजियन पद्धतीने विचार करायला बद्ध आहे - ही अपेक्षाच पूर्ण चुकीची नाही का? माणूस आणि मशीन यातला फरक पाश्‍चात्त्य संस्कृती अनेक वेळा विसरतात. अत्यंत असहिष्णुवृत्तीने वागतात हे अनेकवार घडत राहतं. जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर हे संघर्ष वाढत जाणार आहेत, हे मात्र खरं! 
भट्टाचार्य कुटुंब जानेवारीतल्या कडाक्याच्या थंडीत नोकरीच्या निमित्ताने नॉर्वेत आलं. चकचकीत सूर्यप्रकाशाच्या आणि गजबजलेल्या देशातून दिवस-रात्र फक्त अंधार आणि कडाक्याची थंडी असलेल्या सुनसान देशात आल्यावर काय उलथापालथ होते, ती हे सर्व अनुभवणार्‍यांनाच कळू शकतं. पोर एकटं झोपायला घाबरू लागलं. ऐश्‍वर्याच्या जन्मानंतर एकटं पडलं. म्हणून आई-बाबांनी कम्युनिटी सेंटरमध्ये मुलांना घेऊन जाण्याचा परिपाठ ठेवला. भाषा परकी. निदान मुलाला मित्र मिळतील म्हणून ! हे कुटुंब आपल्यापेक्षा वेगळं आहे म्हणताना त्यांच्या प्रत्येक हालचालीवर स्पॉट लाईट राहिला. त्यांच्याशी गोड गोड आणि खोटे खोटे मैत्रीचे चार शब्द बोलून त्यांच्या घरात प्रवेश मिळवला. घराचे फोटो काढले आणि एकमार्गी निर्णय घेऊन मुलं गायब केली.
नॉर्वेजियन अधिकार्‍यांनी असाही पोच दाखविला नाही की, अशा कृतीमुळे यापुढे कोणतेही भारतीय नॉर्वेच्या संस्कृतीत इंटेग्रेट होण्याचा प्रयत्न करण्यास कायमचे कचरतील. घेट्टो करून राहण्याकडेच त्यांचा कल राहील. आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीमध्ये वेगळे मूल्यसंस्कार असू शकतात. त्यांना समजावून घेणं, त्याचा आदर करणं हे खरंच इतकं का कठीण आहे? पंचतंत्रातली गोष्ट आठवते.
एकदा काय झालं ! एक होतं वानर. एका सरोवराकाठी फलभाराने वाकलेल्या झाडाच्या फांदीवर बसून रानमेवा खात होती. खाली पाण्यात एक मासा संथपणे पोहत होता. वानराने त्याची ‘काय? कसं काय’ अशी शिष्टाचाराची चौकशी केली. माशाने सौजन्यपूर्ण उत्तरं दिली. एकदम वानराने फांदीवरून खाली वाकून माशाला घट्ट मुठीत पकडून पाण्याच्या बाहेर काढलं आणि काठावर टाकले. गुदमरलेल्या आवाजात आणि तडफडताना मासा चित्कारला - ‘‘अरे बाबा, काय करतोयस?’’ वानर मोठय़ा शेखीत उद्गारला- ‘‘मूर्खा, तुला पाण्यात बुडण्यापासून वाचवतोय मी. त्याचे धन्यवाद मान !’’ 
६.६ अब्ज पृथ्वीवासीयांचे साधे बोटाचे ठसेसुद्धा एकसारखे नसतात. तिथे ‘सुसंस्कृतपणा’ या शब्दाची व्याख्या कोण्या एका-दोघांनी ठरवावी आणि ती एकगठ्ठा समस्त मानवजातीला लागू करायला पहावी, हे आता कुठेतरी थांबायला नको का?


- वैशाली करमरकर,लोकमत

1 comment:

mahendra said...

ओघवत्या भाषेत लिहिल्याने लेख मस्त जमलाय.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...