एकाकी नसलेलं एकटेपण



परिस्थितीमुळे किंवा स्वत:ला वाटलं म्हणून अनेकजणी आज एकेकटय़ा राहात आहेत. प्रत्येकाची कारणं वेगळी, अनुभव वेगळे. समाजाला हे एकटेपण मात्र कधी मानवलं नाही. त्याने टोमणे मारले, त्रास दिला, तर क्वचितच समजून घेतलं. आज समाजात वाढीस लागलेल्या या एकेकटींचे हे अनुभव. एकाकी पण एकटेपण नसलेले..
आपल्यापैकी सगळेच जण मनात असा विश्वास ठेवून मोठे होतात की एक ना एक दिवस आपल्याला   मनासारखा जोडीदार मिळणार आहे; असा खास माणूस की ज्याच्याबरोबर आपण संपूर्ण आयुष्य आनंदात घालवणार आहोत. पण वास्तवात असे घडतेच असे नाही.  अनेक लोकांच्या बाबतीत त्यांच्या अपेक्षा फोल ठरतात. आपल्या आवडीच्या जोडीदाराबरोबर लग्न करूनही घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रणय हा खरोखर हवेसारखा असतो. जोपर्यंत तो मिळतो तोपर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही. मित्रमैत्रिणी अनेक असले तरी आयुष्याचा जोडीदार म्हणून नजर स्थिर करताना कोणा एकाचीच निवड होते. पण तो कुणी एक आयुष्यभर सोबत करेलच हे चित्र आजकाल कमी होऊ लागलं आहे.
भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकावरचा ‘एकलांचा देश’ म्हणून गणला जाऊ लागला आहे. इतकी एकटय़ा राहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: तरुण पिढीमध्ये. याबाबतीत आम्ही जो सव्‍‌र्हे केला तो थबकवणारा होता. सध्याची ही तरुण प्रजा गलेलठ्ठ पगार, इंटरनेट, स्मार्ट फोन यांमध्ये गर्क आहे. ‘एकटे असणे’ आणि ‘एकाकी’ असणे या संज्ञेतील फरक त्यांनी अचूक समजून घेतला आहे. इतिहासात पूर्वी कधीही असे घडले नव्हते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आज लोक एकेकटे राहात आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे हे स्त्री-पुरुष आपण आनंदी असण्याचा बहाणा करत नाहीत तर वास्तवात खरोखरच ते आनंदी आहेत. त्यांच्या अर्थार्जनातील स्वायत्ततेमुळेच हे त्यांचे खासगीपण विकत घेऊ शकतात हे उघडच दिसते. या सर्व एकलांचे म्हणणे असे की, ‘‘एकटे राहाणे याचा अर्थ सामाजिक जीवन कमी, असा होत नाही. उलट विवाहित जोडप्याला ज्या अनेक घरगुती जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात, त्यांच्यातून यांची सुटका होते. ते मित्रांबरोबर जास्त वेळ घालवू शकतात आणि इतरांसाठी अनेक गोष्टीसुद्धा करू शकतात. अगदी सामाजिक कार्यदेखील.’’
व्यवसायाने वकील असलेली, नगर येथील कोर्टात प्रॅक्टिस करणारी सुप्रिया म्हणते, ‘‘माझी कौटुंबिक परिस्थिती बेतास बात होती. सी. ए. करायचे होते, पण इतका धीर धरता येईल अशी ती वेळ नव्हती. चार भावंडे, मीच कर्ती, रिझल्ट लागण्यापूर्वीच कोर्टाची पायरी चढले. भरपूर मेहनत व लोकांशी जमवून घेण्याची वृत्ती यामुळे लवकर जम बसला. पुन्हा मागे वळून बघायला सवड झाली नाही. पुढे आर्थिक गरज उरली नाही, पण आता हेच आयुष्य बरे वाटते. कॅम्पॅनिअन असावा असे वाटते, पण लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी तयारी नाही.’’
चारुता गोखले ही मायक्रोबॉयॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली मुलगी. तिने स्वत:च ठरवले की मलेरिया या रोगावर गडचिरोली येथे डॉ. अभय व राणी बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेत आदिवासी गावांमध्ये काम करायचे. ती सांगते, ‘‘२००६ पासून ‘निर्माण’ या युवा चळवळीचाच हा भाग असल्यामुळे ‘सर्च’चे वातावरण माझ्यासाठी नवखे नव्हते. पूर्वीच्या मित्र-मैत्रिणींच्या कळपातून खूप दूर आले असे वाटून असुरक्षितही वाटले कधी, पण ‘सर्च’मधील माझ्याच वयाच्या समविचारी इतर तरुणांकडे पाहून आपण एकटे नाही याची खात्री वाटते आणि कामासाठी नवीन उमेद मिळते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून आलेली आम्ही १५/२० जण एकत्र राहातो. गणपतीपासून कोजागरीपर्यंत आणि बैलपोळ्यापासून ते नागपंचमीपर्यंत सगळे सण साजरे करतो. हे वातावरण मला सहजीवनाची अनुभूती देते. इथल्या आव्हानांना ग्लॅमर नाही, पाच अंकी पगार नाही, पण अपार समाधान मात्र आहे..
दिल्लीला लजपतनगरमध्ये राहणाऱ्या बिंदू शर्माला ‘सिंगल लाइफ’  चांगलेच मानवते. ती म्हणते, ‘‘तुम्ही स्वतंत्र असताना आज तुम्हाला चायनीज खावेसे वाटले तर खाऊ शकता. काही ठरवायचे असेल, काही घ्यायचे असेल तर ते इतरांच्या मूडवर अवलंबून नसते. शिवाय मित्र तुम्हाला आवश्यक तो आधार देतात. न्यूयॉर्कमधील बहिणीशी मी नेटवर बोलू शकते. फेसबुकवरून सर्व मित्र-मैत्रिणींच्या सान्निध्यात मी असते. मला आणखी काही हवे असे वाटत नाही.’’
दिल्लीत स्थायिक असलेल्या गौरी दाबके या विवाहसमुपदेशक आहेत. त्या सांगतात, ‘‘पालकांना त्यांची मुले विवाहित झालेली पाहाण्याची घाई झालेली असते. त्यांना आशा असते की, समुपदेशक त्यांचे ब्रेनवॉश करतील. पण मुलांनी त्यांच्या आजूबाजूचे फसलेले विवाह पाहिलेले असतात. त्यामुळे आजकालचे अनेक तरुण लग्नाच्या विरोधात असतात. असा निदान माझा तरी अनुभव आहे.’’
‘कॅन लव्ह हॅपन ट्वाईस’चे लेखक रवीन्द्र सिंह, हैदराबाद, दिल्ली, चंदिगड असे अनेक ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यांच्या मते स्वतंत्रपणे एकटे राहून इतरांच्या सान्निध्यात असणे हा अनुभव भावणारा असतो.
प्रसिद्ध लेखिका विनया खडपेकर ज्यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या सांगतात, ‘‘माझ्या आयुष्यात ‘तो’ कधी आलाच नाही. लग्न न करण्याचा निर्णय जबरदस्तीने किंवा विरक्तीने घेतलेला नाही तर तो परिस्थितीजन्य होता. आपल्या स्वभावाला मिळतेजुळते कोणी मिळणार नाही असे वाटले किंवा त्याचे आगमन एखाद्या सहलीत किंवा पावसाच्या धारांमध्ये किंवा सभासंमेलनात होईल असे वाटले. पण तशी संधीच मिळाली नाही. शिक्षण संपण्याआधीच  रूढीप्रिय, पारंपरिक दाखवणे, पत्रिका जुळवणे या पद्धतीतून नातेवाईक माझं लग्न करणार अशी चिन्हे दिसू लागली. या गोष्टीला माझा ठाम नकार होता.  पुढे वय वाढले. तशी दोन वेळा प्रेमात पडले, एकदा फसवणूकही झाली. एक नक्की म्हणता येईल की माझ्यात आसुसलेली आई नव्हती. समर्पित पत्नी नव्हती, पण उत्कट प्रणयिनी होती. उत्सुक सखी होती. ती मात्र वंचित राहिली. ’’
 एकटे राहाण्याच्या बाबतीत भोवतालच्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. एकतर, ‘‘तुमची काय बाई मज्जा आहे, एकटय़ाच आहात.’’ किंवा मग करुणाभरल्या डोळ्यांनी ‘एकटय़ाच आहात? कसे होणार हो तुमचे? वेळ तरी कसा घालवता? कोण करणार तुमचे पुढे?’’ - त्यावर विनयाताईंचे उत्तर असे, ‘‘तुम्हाला वाटते एवढे एकटेपण  भयंकर मुळीच नाही. त्यातही एक गंमत आहे. पण हेही तितकंच खरं की विवाहित स्त्रियांना विवाहाचे फायदे अधिक मिळतात.’’
एकटेपण अनुभवणाऱ्या अनेक जणी आज छान आयुष्यही जगताहेत किंबहुना अशा एकटय़ा तरुणींची, स्त्रियांची संख्या वाढतेच आहे असाही अनुभव आहे. सॉफ्टवेअर इंजिनीयर स्मिता सांगते, ‘‘मला पुरुषाची गरज वाटत नाही. अगदी प्रामाणिकपणे वाटत नाही. प्रत्येक वेलीला वृक्षाच्या आधाराची गरज असते ही हूल कोणी उठवली? तुमची विचारसरणी तुम्ही आमच्यावर का लादता? एकटय़ा असणाऱ्या बायकांना कॅन्सर होतो, त्या लवकर म्हाताऱ्या दिसतात असाही अपप्रचार ज्यांना नावलौकिक मिळत नाही अशाच बायका पसरवतात. प्रपंचात थकून-पिचून गेलेल्या गृहिणी काय कमी आहेत!’’
पुण्याच्या मेधा कुलकर्णी या एक हात व एका पायांनी अपंग आहेत. खूप कष्टाने व जिद्दीने त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व सेन्ट्रल बँकेत नोकरीला लागल्या. आपल्या अपंगत्वाचा कोणावर भार पडू नये म्हणून त्यांनी स्वत:हूनच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. स्वत: अपंग असूनही दुसऱ्याला जमेल ती मदत करण्याच्या स्वभावामुळे व अत्यंत खिलाडूवृत्तीमुळे त्या लोकप्रिय ठरल्या. आपल्या सारख्याच इतर बांधवांना मदत करण्याची त्यांची तीव्र आंतरिक इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या बँकेतील लठ्ठ पगाराच्या ऑफिसरपदाचा राजीनामा देऊन, व्ही. आर. एस. घेऊन मिळालेल्या पैशातून अपंगांसाठी संस्था काढली. आज त्या या कामात समरसून गेल्या आहेत.  इतक्या की स्वत:चं स्वतंत्र कुटुंब हवं या विचारावर त्यांनी फुलीच मारली आहे.
मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या उज्ज्वलाने अविवाहित राहाण्याचा निर्णय बाय चॉईस जरी घेतला असला तरी या निर्णयासाठी त्यावेळची परिस्थिती कारणीभूत झाली असे त्या सांगतात. ‘‘एकतर शिक्षण घेता घेता चोविशी आली, त्यात वकिली व्यवसाय असल्यामुळे ‘उत्पन्न किती’ या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच सुरुवातीच्या काळात समजत नसे.. शिवाय लेडी अ‍ॅडव्होकेटसच्या बाबतीत आणखीन एक नकारात्मक बाजू म्हणजे त्या भांडकुदळ असतील, सतरा अग्र्युमेंट्स करतील असा एक गैरसमज वरपक्षामध्ये असतो. स्थिरस्थावर होता होता अठ्ठाविशी आली आणि मग एक मोठे आजारपण आले. त्यात शारीरिक परिस्थिती इतकी ढासळली की डॉक्टरांनी लग्न करू नका, मुले तर अजिबात होऊ देऊ नका असे सांगितले. त्यामुळे विवाह हा प्रश्न लांबणीवर पडला. पुढे हेच रुटीन अंगवळणी पडले. वाचन, ट्रेकिंग, प्रवास हे तीन छंद भरपूर प्रमाणात जोपासले. आयुष्याच्या या वळणावरही आपला निर्णय चुकला असे वाटत नाही. उलट काही मैत्रिणी संसार करून आता विधवा झाल्यामुळे पुन्हा एकटय़ा झाल्या आहेत.’’ अर्थात एकटे असल्यामुळे लोक आपल्याला गृहीत धरतात याची खंत मात्र अधूनमधून वाटते. हे मात्र त्या आवर्जून सांगतात.
 परिस्थितीजन्य असो वा स्वत:चा निर्णय असो. पण जेव्हा स्त्री एकटं राह्य़ला लागते तेव्हा मात्र तिला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. अनेक गोष्टी कारण नसताना ऐकाव्या लागतातच.
पालिकेमध्ये काम करणारी सुनीता सांगते, ‘‘संध्याकाळी घरी एकटी काय करते?’’ किंवा ‘‘रात्री एकटी झोप येते का?’’ कधी काळजीने तर कधी खोचकपणे विचारलेले हे प्रश्न काळजाला घरे पाडतात. नाही वाटले लग्न करावेसे म्हणून नाही केले. एकटे राहाणे अवघड असले तरी आनंददायीसुद्धा आहे हे मी खात्रीने     सांगू शकते. लोकांशी सकारात्मक अर्थपूर्ण नात्यांचा पूल सांधायचा की लष्करातील पुलाप्रमाणे तात्पुरता काम संपले की उखडून टाकणारा पूल बांधायचा हे तुमच्यावर अवलंबून असते. अपर्णा शिक्षिका आहे, ती सांगते, ‘‘मी एकटीच राहाते म्हणून माझ्या दारावरची बेल वाजवून पळणे, अश्लील पत्र लिहिणे, सार्वजनिक फोनवरून अश्लील बोलणे असे अनुभव मला आले. यामधून पुरुषी भेकडपणा सिद्ध होतो. म्हणून एकटे राहाताना आसपास सुसंस्कृत वस्ती असेल. तेथेच घर घ्यावे असाच मी सल्ला देईन. तर मी एकटी असल्याने सतत संशयाने बघणारे, मुद्दाम खोदून खोदून प्रश्न विचारणारे, माझ्या मित्र मैत्रिणींवर नजर ठेवणारे खूप भेटतात,’’ असं माधवी सांगते.
कॉलसेंटरमध्येच उच्च पदावर काम करणारी शलाका आता तीस वर्षांची आहे. पण तिच्या मते लग्न हा मोठा जुगार आहे. ती तिच्या अवतीभोवती सगळे विस्कटलेले संसार पाहाते आहे. अगदी २ ते ८ महिन्यांत झालेले घटस्फोट पाहाते आहे. लग्न झाल्यावरही विवाहबाह्य़ संबंध असणारे तिचे सहकारी पाहाते आहे. म्हणून इतक्या निसरडय़ा वाटेवरून चालण्याचा तिचा ठाम नकार आहे.
एका बाजूला असे स्वीकारलेले एक टेपण आहे तर काहींच्या बाबतीत ती जबरदस्ती आहे. मौशुमी नावाची पुण्यातील कॉलसेंटरमध्ये काम करणारी मुलगी आहे. ती निशिकांतच्या प्रेमात पडली, पण निशिकांत विवाहित आहे. त्याला दोन मुले आहेत. मौशुमी हे सर्व जाणून आहे; तरीही त्याच्याशी कमिटेड आहे. निशिकांतने बायकोला घटस्फोट दिल्याशिवाय त्यांचे लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे ती सध्या एकटी रहाते आहे. अशा अनेक मौशुमी आणि अनेक निशिकांत अनेक ऑफिसेसमध्ये आहेत. भवितव्य माहीत नसल्याने एकेकटे राहात आहेत.
इतकंच कशाला कॉलसेंटरमध्ये काम करण्यासाठी नॉर्थ-ईस्ट मुलींचे जथ्थेच्या-जथ्थे येतात. या मुलींना ‘चिंकी मुली’ असे संबोधण्यात येते. २० ते ३० वयोगटांतील या तरुणी आसाम, मणिपूर, मिझोराम येथून आलेल्या असतात. तिकडे त्यांचे १०/१२ माणसांचे कुटुंब असते. त्यांना पैशाची खूप निकड असल्याने गावी पैसे पाठवायचे असतात. शिक्षण कमी असते, कसलाच विधिनिषेध नसतो. आठवडय़ातून ५ दिवस काम केल्यावर शनिवार-रविवार त्या प्रचंड धुमाकूळ घालतात. पैसेवाले, श्रीमंत मुले त्यांना बरोबर टार्गेट करतात. सगळा खुल्लमखुल्ला व्यवहार असतो. अशा परिस्थितीत लग्न वगैरे गोष्टी खूप दूर दूर राहातात. काही जणीसाठी तर ते एक स्वप्नच ठरतं. पण त्याची त्या पर्वा करीत नाहीत. एकटं राहाण्यातली ‘मजा’ त्या अनुभवताहेत.
आज विवाह या शब्दाला जोडशब्द कुठला असे विचारल्यास ‘समस्या’ हा शब्द डोळ्यांसमोर येतो इतके त्याचे स्वरूप गंभीर होत चालले आहे. सध्या आपण अशा काळात जगतो जेथे स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा अत्यंत टोकाच्या आहेत आणि पालक त्याबाबत हतबल आहेत. खरं तर लग्न ही व्यवस्था लोकांच्याच भल्यासाठी असल्याचे अनेक अभ्यासक सांगतात. त्यांच्यानुसार, जी जोडपी विवाह न करता एकत्र राहतात. त्यांच्यापेक्षाही विवाहित जोडप्यांचे आरोग्य अधिक चांगले असते. याचे कारण असे की, फक्त सहनिवासापेक्षा लग्नामध्ये भावनिक सुरक्षितता अधिक आहे. अमेरिकेतील लोकसंख्या अभ्यास मंडळाची अध्यक्ष लिंडा वेट हिने असे सांगितले की, स्त्री आणि पुरुष दोघांनाही विवाहामुळे दीर्घायुष्य लाभते. विवाहित पुरुष सरासरी अविवाहित पुरुषापेक्षा १० वर्षे अधिक जगतो तर विवाहित स्त्री सरासरी अविवाहित स्त्रीपेक्षा ४ वर्षे अधिक जगते. समजा अशा एकटय़ा स्त्रीला कधी एखाद्या जोडीदाराची गरज भासली तर त्याला पारंपरिक पद्धतीने पाप म्हणणे हास्यास्पद ठरेल. तिची ही गरज भागवली गेली तर नैराश्य तिला वेढणार नाही किंवा वारंवार आजारी पडणार नाही, पण समाजाला ते पचनी पडेल का हा प्रश्न आहे.
एकटं रहाणं किंवा एकत्र रहाणं या दोन्हींमध्ये फायदे तोटे आहेतच. काहीवेळा न टाळता येणाऱ्या परिस्थितीमुळे तर काही वेळा स्वत:चा निर्णय म्हणून अनेकींनी एकटं रहाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यात त्यांना अनेकदा समाजाची साथ लाभतेही तर काही वेळा ‘ठोकरमें है ये जमाना’ म्हणत त्यांची वाटचाल चालू असते. त्यांच्यासाठी  समाज म्हणून आपण काय करणार आहोत, मानसिकदृष्टय़ा त्या एकाकीपणाचं ओझं त्यांच्यावर पडू नये यासाठी कसे वागणार आहोत हाच खरा प्रश्न आहे. कारण यापुढे एकटं रहाणाऱ्यांची संख्या वाढतच जाणार आहे ..


शुभदा विद्वांस ,लोकसत्ता
chaturang@expressindia.com

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...