निग्रही आक्रमकता

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हाइरन्मेंट (सीएसई) ही देशभरात पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणारी भारतातील एक मोठी आणि सर्वपरिचित संस्था. त्याच्या माध्यमातून कीटकनाशक असणाऱ्या पेयांविरुद्ध कोलायुद्ध जिंकणाऱ्या, दिल्लीतील वाहन प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजीच्या वापरासाठी यशस्वी संघर्ष करणाऱ्या, फास्ट फूडमधील साखर आणि मिठाचे अवाजवी प्रमाणामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत देशात जागरूकता निर्माण करणाऱ्या, सुनीता नारायण यांच्या सोशल करिअरविषयी.. 
देशभरात पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणारी ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हाइरन्मेंट’ (सीएसई) ही भारतातील एक मोठी आणि सर्वपरिचित संस्था. शहरं प्रदूषणमुक्त करण्यासाठी सीएनजीवर वाहने चालविण्याची मोहीम, कोका कोला आणि पेप्सीच्या शीतपेयांमधील विषारी व प्राणघातक कीटकनाशकांचा मुद्दा, मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या ट्रान्सफॅटस्चा खाद्यतेलांमधील धोकादायक स्तर आणि लठ्ठपणा व मधुमेहाला चालना देणाऱ्या पोटॅटो चिप्स, आलूभुजिया, नूडल्स, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रेंच फ्राइज आणि फ्राइड चिकनसारख्या फास्ट फूडमधील साखर आणि मिठाचे अवाजवी प्रमाण अशा सार्वजनिक आरोग्याशी निगडित मुद्दय़ांकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधून देशात जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संस्था सातत्याने करीत आहे. ऐंशीच्या दशकात जेव्हा पर्यावरणविषयक जाणिवा आजच्याइतक्या तीव्र झाल्या नव्हत्या तेव्हा द्रष्टे पर्यावरणतज्ज्ञ, दिवंगत अनिल अग्रवाल यांनी राजधानी दिल्लीत या संस्थेचा पाया रचला. अग्रवाल यांनी आपल्या हयातीत संचालकपदी नेमलेल्या सुनीता नारायण यांनी आज त्यावर कळस चढविला आहे. आज त्या या सगळ्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्याचे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत.
सुनीता नारायण यांचा जन्म दिल्लीतील चांदनी चौक भागात राहणाऱ्या चांदीवाला कुटुंबातला. २३ ऑगस्ट १९६१ चा. चार बहिणींमध्ये त्या थोरल्या. स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय भूमिका बजावल्यानंतर वडील राज नारायण यांनी  हस्तकला निर्यातीचा व्यवसाय सुरूकेला. पण सुनीता सात वर्षांच्या असतानाच त्यांचे निधन झाले आणि चार मुलींच्या संगोपनाची सारी जबाबदारी आई उषा नारायण यांच्यावर पडली. सुनीताचे आजोबा ब्रिटिश राजवटीत नावाजलेले पत्रकार होते. त्यांनी रॉयटर्स, एएफपीचे प्रतिनिधी म्हणून काम केले तसेच अनेक बडय़ा वृत्तपत्रांमध्ये लेखन केले. पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर महमद अली जिनांशी त्यांचे उत्तम संबंध होते, तर त्यांचे धाकटे बंधू ब्रिजकृष्ण चांदीवाला गांधीजींचे पाचवे पुत्र मानले जात. एक भाऊ गोऱ्या साहेबाप्रमाणे टिपटॉप राहणारे, बुटांना पॉलीश केल्याशिवाय घराबाहेर न पडणारे, तर दुसरे खादीचा साधा पेहराव करणारे व गांधीजींवरील अलोट श्रद्धेपोटी मिठाचाही त्याग करणारे. या वैशिष्टय़ांमुळे जिना आणि गांधीजी अनेकदा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी चांदीवालांच्या घरी एकत्र येत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठात आजोबांना शिकवलेले. दिल्लीत आल्यानंतर तेही चांदीवालांच्या घरी यायचे. अशा विचारवंतांची ऊठबस लाभलेल्या घरात जन्मलेल्या सुनीताच्या मनावर या ऐतिहासिक  पाश्र्वभूमीचे महत्त्व त्यांच्या आईने कोरले. परिणामी सुनीताला पुढे जाऊन सामान्य कार्यकर्त्यां ते आंदोलक, पत्रकार, लेखक, संपादक, संशोधक, अकाऊंटंट, विक्रेत्या अशा विविध भूमिका सहजगत्या बजावणे शक्य झाले.‘देशासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात योगदान देण्याची आमच्या कुटुंबातील सदस्यांची परंपरा आहे आणि मी तसे केले नसते तर माझ्यासाठी ती शरमेची बाब ठरली असती’, असे सुनीता नारायण म्हणतात. सुनीताच्या कारकीर्दीत मोलाचा हातभार लागला तो आई उषा नारायण आणि ‘सीएसई’चे संस्थापक अग्रवाल यांचा. सुनीताच्या मनात चिपको आंदोलनामुळे प्रभावित होऊन पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची तीव्र इच्छा होती. दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये शिकताना त्यांनी काही सहकाऱ्यांसोबत ‘कल्पवृक्ष’ नावाचा गट स्थापन केला होता. पण शालेय शिक्षणानंतर पर्यावरणविषयक अभ्यासक्रम कुठेही उपलब्ध नव्हता. महाविद्यालयात प्रवेश घेण्याऐवजी एक वर्ष सुटी घेऊन पर्यावरणाच्या क्षेत्रातील संधी शोधण्याची प्रेरणा आणि मुभा सुनीताला त्यांच्या आईने दिली. आईची जिद्द, निर्धार आणि खंबीरपणाची मी प्रॉडक्ट आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. पर्यावरणाच्या क्षेत्रात मुशाफिरी सुरू असताना १९८१ साली त्यांची भेट ब्रिटनमधून नुकतेच आलेले अनिल अग्रवाल यांच्याशी झाली. त्या वेळी त्यांनी सीएसईची स्थापना केली होती. अग्रवाल यांनी आयआयटीमध्ये इंजिनीअरिंग केले होते तसेच इंडियन एक्स्प्रेस, हिंदूुस्तान टाइम्समध्ये पत्रकारिता केली होती. भारतातील पर्यावरणाच्या समस्यांवर ‘स्टेट ऑफ इंडिया’चा अहवाल तयार करण्याची त्यांची इच्छा होती. सीएसईमध्ये सुनीताने कार्यकर्त्यांची भूमिका बजावत अग्रवाल यांना अभिप्रेत असलेला अहवाल तयार केला. पण तो छापण्यासाठी संस्थेकडे पैसा नव्हता. शेवटी या अहवालाच्या शंभर प्रती तयार करून त्या मुंबईत खपविण्याची जबाबदारी सुनीतावर टाकण्यात आली. अंकांची मागणी वाढली तशी पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल घेऊन जाण्याचेही काम करावे लागले. या अनुभवांमुळेच सुनीता सेल्स आणि मार्केटिंगचे काम चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यातल्या वेदना जाणू शकतात. आयुष्यात सारी कामे करणे कसे आवश्यक आहे आणि प्रत्येक काम किती मेहनतीचे असते, याची जाणीव आपल्याला झाल्याचे त्या सांगतात. 
‘सीएसई’मध्ये सुनीता आणि अन्य सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अनिल अग्रवाल यांनी संस्थेसाठी भविष्याचा रोडमॅप तयार केला होता. देशात भविष्यात पाण्याची समस्या का वाढेल, नद्या का वाचणार नाहीत, याची कल्पना अग्रवाल यांना तीन दशकांपूर्वीच आली होती. शास्त्रीय वस्तुस्थिती, माहिती आणि वास्तवाची सांगड घालत अनिल अग्रवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांना मुद्दय़ाच्या मुळाशी कसे जायचे, याचे धडे दिले. अनिल अग्रवाल यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात पर्यावरणाविषयी जे काही विचार मांडले ते आजही नवे आहेत. आजच्या बदललेल्या काळातही ते तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आपल्या कारकीर्दीत नवे काहीच लिहिलेले नाही आणि नवे काहीच केले नाही. अनिलनी जे काही द्रष्टेपणाचे काम केले तेच आम्ही पुढे कायम राखले आहे, अनिल अद्वितीय व्यक्ती होते, अशी प्रामाणिक कबुली सुनीता नारायण देतात. आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकताना ते अधिक ठसठशीतपणे उमटवण्याची जबाबदारीही घेतात.
अनिल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीता नारायण १९९३ साली संस्थेच्या उपसंचालक झाल्या. अग्रवाल यांना असाध्य आजारातून बरे होत नसल्याची खात्री पटली तेव्हा त्यांनी आपल्या हयातीतच २००० साली संस्थेच्या संचालकपदाची सूत्रे सुनीताकडे सोपविली. वर्षभरानंतर अनिल अग्रवाल यांचे निधन झाले आणि दोन वर्षांपूर्वी आईंचेही देहावसान झाले. सुनीतासाठी हे दोन मोठेच धक्के होते. पण संघर्ष करणे हा सुनीताचा स्थायिभाव झाला होता. खरे तर अनिलच ‘सीएसई’ होते. सारे जग अनिलला ओळखत होते. ‘सीएसई’चा कारभार कशा प्रकारे चालवायचा हे सुनीतापुढे आव्हान होते. अनिलचे निधन झाले त्या वेळी ‘सीएसई’ दिल्लीत सीएनजी आणण्याच्या मुद्दय़ावर लढत होती. तत्कालिन पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी नेमलेल्या डॉ. माशेलकर समितीने आपल्या अंतरिम अहवालात दिल्लीतील वाहन प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजीचा वापर करण्याचा प्रस्ताव बकवास असल्याचे म्हटले होते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेला सीएनजीचे महत्त्व पटवून ‘सीएसई’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि २००२ मध्ये सीएनजीसाठीचा ‘सीएसई’चा आग्रह सरकारला मान्य करणे भाग पडले. आमच्यापुढे लढण्यावाचून पर्यायच नव्हता. युद्धात एक तर पळून जा, मरा किंवाजिंका असेच विकल्प असतात, असे या संघर्षांविषयी बोलताना सुनीता सांगतात.
२००३ साली ‘सीएसई’ने प्रयोगशाळेत भूजलाची चाचणी केली. त्यात शरीरास अपायकारक ठरणारी कीटकनाशके मोठय़ा प्रमाणावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोका कोला आणि पेप्सीसह १२ प्रसिद्ध शीतपेयांची चाचणी करण्यात आली आणि त्यातही कीटकनाशके असल्याचा अहवालात दावा करण्यात आल्याने ‘सीएसई’ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोलायुद्ध पेटले. सारा देश त्यात ढवळून निघाला. वाजपेयी सरकारला तथ्यांची चौकशी करण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांची संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी लागली. तोपर्यंत बोफोर्स, हर्षद मेहता प्रकरण, शेअर बाजारातील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठीच संयुक्त संसदीय समितीचा अवलंब करण्यात आला होता. या प्रकरणात प्रसिद्धीचा रोख कोला कंपन्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुनीतावर आला. सुनीता जातील तिथे त्यांच्या बाजूने किंवा विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. ‘देख लेना पैसे खायेगी,’ अशा टोकाच्या तिखट प्रतिक्रियेलाही त्यांना सामोरे जावे लागले. पण सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दय़ांवर परखड मते मांडणारी संस्था म्हणून ‘सीएसई’ने सुनीतांच्या नेतृत्वाखाली स्वत:ची नवी ओळख प्रस्थापित केली होती. संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीदरम्यान अतिशय तणावाच्या काळात पृथ्वीराज चव्हाण, संजय निरुपम, अखिलेश यादव यांच्यासारख्या सदस्यांनी ‘सीएसई’चे म्हणणे समजून घेत कीटकनाशक धोरण निश्चित करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आणि शास्त्रज्ञांनीही आतून कमालीची साथ दिली, याचा सुनीता आवर्जून उल्लेख करतात. 
ट्रान्सफॅटस्चे खाद्यतेलांमधील प्रमाण तसेच पोटॅटो चिप्स, भुजिया, नूडल्स, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रेंच फ्राइज आणि फ्राइड चिकनसारख्या फास्ट फूडमधील साखर आणि मिठाच्या अतिरेकाच्या मुद्दय़ांवर ‘सीएसई’च्या लढय़ात देशवासीयांनी पुरेपूर साथ दिली आणि ‘सीएसई’ची विश्वासार्हता त्यामुळे द्विगुणित झाली. सुनीता नारायण म्हणतात ती गोष्ट आपल्या भल्याची असते, हे हळूहळू लोकांना पटू लागले. या विश्वासाच्या ओझ्याने ‘सीएसई’(The Centre for Science and Environment (CSE) ) दबलेली आहे, अशी भावना सुनीता व्यक्त करतात. कोला आणि जंक फूडच्या जाहिराती करून शाहरुख खान आणि आमिर खान नव्या पिढीला अनारोग्याच्या खाईत लोटण्याचे काम करीत होते, असा सुनीता नारायण यांचा आरोप आहे. ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकावा तेच आम्हाला जंक फूड खा, आजारी पडा, कर्करोग होऊ द्या आणि लवकर मरा, असे जाहिरातींतून सांगत होते, त्याबद्दल त्या संताप व्यक्त करतात. 
‘सीएसई’ने आपल्या अभ्यासाचा रोख प्रामुख्याने देशातील पाणी आणि प्रदूषणाच्या समस्यांवर केंद्रित केला आहे. संशोधन, लिखाण आणि संपादित करीत असलेली ‘डाऊन टू अर्थ’-Down to Earth आणि शाळकरी मुलांसाठी ‘गोबर टाइम्स’ही पाक्षिके, वेबसाइट, प्रशिक्षण अशा माध्यमांतून सुनीता आणि त्यांचे सहकारी आपल्या संस्थेच्या सडेतोड भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. 
आजोबांच्या पत्रकारितेच्या वारशाला गांधीजींच्या शांत पण निग्रही संतापाची जोड देत देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे सुनीता नारायण यांचे व्रत तीन दशकांपासून अखंडपणे सुरू आहे.


सुनील चावके ,लोकसत्ता
chaturang@expressindia.com

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...